पत्रकार हे जनता आणि पोलीस यांच्यातील दुवा – जेष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ

पुणे – नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस दिवसरात्र काम करत असतात. पोलिसांच्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे पत्रकारही समाजासाठी बातमीदारीतून वार्तांकन करीत असतात. त्यामुळे समाज आणि पोलिस यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पत्रकारांची ओळख आहे. असे मत प्रसिद्ध निवेदक आणि जेष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने उभारण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उदघाटन गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, अपर आयुक्त डॉ. एन.डी.चव्हाण, अपर आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, पत्रकार म्हणून काम करत असताना मला आता ५० वर्ष झाली आहे. वर्तमानपत्रात गुन्हेगारीसह राजकीय बातम्यांना महत्व असते. त्यामुळे क्राईम महत्वाचे बीट आहे. पत्रकार कक्षाच्या कार्यक्रमातील सहभागींसाठी रंग नसलेले फेटे निवडल्यामुळे समाधान वाटले. त्याच बरोबर राजकिय रंग नसलेल्या पत्रकाराला तुम्ही बोलावले आहे, असेही त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, सामाजिक जीवनातील विविध घटनांचे वार्ताकन करताना पत्रकारांना ऑनफिल्ड रिपोर्टिंग करावे लागते.
त्यामुळे अत्याधुनिक काळात रिपोटिंगही खडतर होत चालले आहे. पोलीस आयुक्तालयात पत्रकारांच्या वाहनांसाठी पार्विंâगचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानंतर पत्रकारांनी स्वतंत्र कक्षाची देण्याची मागणी केली होती. आम्ही त्यांची मागणी पुर्ण करू शकलो याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि पत्रकार नवनाथ शिंदे यांनी केले.





