Josh Hazlewood : आयपीएल २०२६ पूर्वी मोठा अनर्थ टळला! आरसीबीचा स्टार खेळाडू थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Josh Hazlewood : चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव सत्रादरम्यान एक भीषण अपघात होता होता टळला, ज्यामध्ये संघाचा स्टार वेगवान गोलंदाज थोडक्यात बचावला आहे.

Josh Hazlewood RCB Injury Escape Video : आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी आरसीबीच्या गोटात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संघाचा मुख्य ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) सरावादरम्यान गंभीर दुखापत होता-होत थोडक्यात बचावला. प्रशिक्षकांच्या प्रसंगावधानाने एक मोठा अनर्थ टळला असून, आरसीबीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं?
जोश हेझलवूड सध्या आपल्या जुन्या दुखापतीतून सावरत असून तो फिटनेसवर काम करत आहे. सरावादरम्यान हेझलवूड एका बाजूला स्ट्रेचिंग करत असताना, दुसऱ्या बाजूला देवदत्त पडिक्कल फलंदाजीचा सराव करत होता. पडिक्कलने एक जोरदार फटका मारला आणि चेंडू थेट हेझलवूडच्या दिशेने वेगाने गेला. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या फिजिओ आणि स्ट्रेंथ कोचच्या सतर्कतेमुळे हेझलवूडला वेळीच सावध करण्यात आले आणि चेंडू त्याला लागला नाही. जर हा चेंडू लागला असता, तर हेझलवूड या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला असता.
View this post on Instagram
पहिल्या सामन्यातून हेझलवूड बाहेर –
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, हेझलवूड त्याच्या हॅमस्ट्रिंग आणि अकिलीस टेंडनच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो सध्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असून त्याच्या फिटनेसवर वैद्यकीय टीमचे बारीक लक्ष आहे. हेझलवूडच्या अनुपस्थितीत आरसीबीच्या गोलंदाजीची धुरा कोणावर असेल, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
आधीच नुवान तुषारा आणि यश दयाल यांच्या बाहेर पडण्याने आरसीबीची गोलंदाजी अडचणीत असताना हेझलवूडच्या बाबतीत घडलेल्या या प्रकाराने मॅनेजमेंटची चिंता वाढवली आहे. अशात भुवनेश्वर कुमारच पहिल्या सामन्यात आरसीबीच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसू शकतो.





