ISSF Junior World Cup : भारताच्या युवा नेमबाजांची कमाल! जोनाथनने सुवर्णपदक तर रश्मिकाने पटकावलं रौप्यपदक

ISSF Junior World Cup 2025 : भारताचा १६ वर्षीय नेमबाज जोनाथन गॅविन अँटोनीने शुक्रवारी येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या महिला गटातून भारताच्या रश्मिका सहगलने रौप्य पदकाची कमाई केली.
पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळावणाऱ्या जोनाथनने अंतिम फेरीतही आपली दमदार कामगिरी कायम राखली. त्याने अंतिम फेरीत 24 पैकी 21 शॉट्सवर गुणांची कमाई करताना सुवर्णपदक पटकावले. जोनाथनने 244.8 गुणांसह विजेतेपदावर आपली मोहोर लावली. इटलीच्या लुका अरिघीने 236.3 गुणांसह रौप्यपदक तर स्पेनच्या लुकास सांचेझ टोमने 215.1 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
महिला गटातून भारताच्या रश्मिका सहगलने देखील शानदार कामगिरी कायम ठेवली, मात्र महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये केवळ 4.8 गुणांच्या फरकाने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात एव्हलिना शिएनाने 240.9 गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
भारताच्या रश्मिका सहगलने 236.1 गुणांसह रौप्यपदक तर इराणच्या फातेमा शेखरीने 213.8 गुणांसह कांस्यपदक मिळवले. याच गटाच्या अंतिम फेरीत भारताची वंशिका चौधरीने 174.2 गुणांसह पाचवे तर मोहिनी सिंगने 153.2 गुणांसह सहावे स्थान राखले.




