Shinde Group | Bjp News – राज्यपालपदी नियुक्ती करण्याचे आश्वासन फेटाळल्याचा ठपका भाजपवर ठेवत शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी १५ दिवस प्रतीक्षा करू अन्यथा अमरावतीमधून भाजपचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या नवनीत राणा यांच्या जात वैधतेला आव्हान देऊ, असे जाहीर केले आहे. अडसूळ म्हणाले, नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाने नव्या राज्यपालांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. यात आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही माझं नाव नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यांना आठवण करून दिली की आपल्याला त्यांनी (भाजपाने) काय आश्वासन दिलं होतं. सध्या मी संयम ठेवला आहे. थोडी वाट पाहणार आहे, अन्यथा मी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करणार आहे. मला गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते. मी आणखी १५ दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे, अन्यथा मी नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देईन. असं देखील म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांचे पती रवी राणा म्हणाले की, “अडसूळ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे, त्यासाठी लागणारा खर्च मी उचलण्यास तयार आहे. आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यानेही वडिलांना राज्यपालपद नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली’ आहे.