Johnson Charles Controversy : पंचांचा ऐतिहासिक ब्लंडर! बाद झालेला खेळाडू ५ मिनिटांनंतर पुन्हा खेळायला उतरला अन् जिंकवला सामना; पाहा मोठा राडा
Johnson Charles Controversy : क्रिकेटच्या नियमांना कलाटणी देणारा आणि चाहत्यांना चकित करणारा एक हायव्होल्टेज ड्रामा सीपीएल २०२६ मध्ये पाहायला मिळाला.

Johnson Charles Bizarre Recall No Ball Controversy CPL 2026 : कॅरेबियन प्रीमियर लीग २०२६ (CPL 2026) स्पर्धेत क्रिकेटच्या नियमांना कलाटणी देणारा आणि चाहत्यांना चकित करणारा एक हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये एकदा फलंदाज बाद होऊन मैदानातून बाहेर पडला की त्याला पुन्हा खेळण्याची परवानगी नसते. मात्र, बार्बाडोस रॉयल्स आणि सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स यांच्यातील सामन्यात बाद झालेला स्टार फलंदाज जॉन्सन चार्ल्स (Johnson Charles) थेट डगआऊटमधून परत मैदानात फलंदाजीसाठी आला आणि सामना जिंकून दिला. पंचांच्या चुकीमुळे झालेल्या या अजब प्रकाराने मैदानावर मोठा गदारोळ निर्माण केला.
डी कॉकचे वादळी शतक; बार्बाडोसने उभारला २१७ धावांचा डोंगर!
या सामन्यात बार्बाडोसच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २१७ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. सलामीवीर क्विंटन डी कॉकने अवघ्या डावात १०६ धावांची तुफानी शतकी खेळी साकारली. त्याला झॅकॅरी कार्टरने ५७ धावांची भक्कम साथ दिली, तर अखेरीस शेरफेन रुदरफोर्डने अवघ्या १६ चेंडूंत २६ धावा कुटल्या. २१८ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सेंट किट्सचा संघ मैदानात उतरला.
फुलटॉस चेंडूवर झेलबाद, तिसऱ्या पंचांचा आऊट निर्णय अन् चार्ल्सची माघार –
They’ve awaken the BEAST! 💪
Johnson Charles celebrates his first fifty of the season with more maximums! 🇰🇳x 🇧🇧 #CPL26 #SKNPvBT #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #ElDorado pic.twitter.com/LOEs98t44Z
— CPL T20 (@CPL) September 2, 2026
सेंट किट्सच्या डावातील चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज रॅमोन सायमंड्सने कमरेच्या उंचीवर एक संशयास्पद फुलटॉस चेंडू टाकला. त्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जॉन्सन चार्ल्स स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला. सेंट किट्सच्या खेळाडूंनी कंबरेवरील नो-बॉलची मागणी केली. मैदानी पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले तपासून चार्ल्सला ‘आऊट’ घोषित केले. पंचांच्या निर्णयाचा आदर करत निराश झालेला चार्ल्स थेट सीमारेषा ओलांडून पॅव्हेलियनमध्ये निघून गेला.
डगआऊटमधील प्रचंड संताप, पंचांची चूक सुधारली अन् चार्ल्सने जिंकवला सामना –
चार्ल्स बाहेर येताच सेंट किट्सच्या डगआऊटने प्रचंड संताप व्यक्त करत पंचांना पुन्हा फुटेज तपासण्याची सक्ती केली. डगआऊटमधील गदारोळानंतर पंचांनी स्क्रीनवर रिप्ले पुन्हा पाहिला, ज्यामध्ये चेंडू स्पष्टपणे कमरेच्या वर म्हणजेच नो-बॉल असल्याचे उघड झाले. यानंतर पंचांनी आपला निर्णय मागे घेतला आणि बाहेर गेलेल्या चार्ल्सला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात बोलावले. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत चार्ल्सने ४५ चेंडूंत ७८ धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली आणि ५ चेंडू राखून सेंट किट्सला ६ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.





