हरियाणात ‘जेजेपी’ला सलग दुसरा मोठा झटका, अनुप धनक यांच्यानंतर आता देवेंद्र बबलींचाही राजीनामा

चंदीगड : हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. दरम्यान, हरियाणात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या सगळ्यात कालपासून जेजेपीला हरियाणात एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) उकलाना आमदार आणि माजी मंत्री अनूप धनक यांनी काल राजीनामा दिला, तर आज जेजेपीला आणखी एक मोठा धक्का बसला. आज शनिवारी टोहानाचे जेजेपी आमदार आणि माजी मंत्री देवेंद्र बबली यांनीही पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
1 ऑक्टोबरला निवडणूक, 4 ऑक्टोबरला निकाल –
हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांवर 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमानुसार, हरियाणा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून 12 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी 13 सप्टेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर आहे. कुमार म्हणाले की, 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा –
हरियाणात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्याचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर रोजी संपत आहे. काँग्रेस हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपने जेजेपीसोबत युतीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर भाजप नेते मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री झाले तर जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर ही युती तुटली. नंतर भाजपने अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने आपले सरकार वाचवले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 5 जागा जिंकल्या होत्या.
2019 च्या निवडणुकांचे निकाल कसे होते ?
हरियाणात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 90 जागांपैकी सर्वाधिक 40 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काॅंग्रेस पक्षाला 31 जागा मिळाल्या होत्या. जेजेपी पक्षाला 10 जागांवर यश मिळाले आणि इतर 9 उमेदवार विजयी झाले.





