आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश? ; अशोक चव्हाणांची भेट अन् चर्चांना उधाण

Jitesh Antapurkar in BJP । नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती उघड झालीय. दरम्यान, या सर्व घडामोडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे . दरम्यान अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात होताना दिसून येतीय.
आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत Jitesh Antapurkar in BJP ।
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे मविआच्या उमेदवाराला परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता या आमदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येतीय. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्या आमदारांच्या नावात आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
अंतापूरकरांची चव्हाणांशी भेट Jitesh Antapurkar in BJP ।
जितेश अंतापूरकर हे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय समजले जातात. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अंतापूरकरही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पक्षांतरबंदीच्या कायद्यामुळे काही नेत्यांनी भाजप प्रवेश टाळल्याचे सांगितले जात होते. रम्यान विधानपरिषद निवडणूकीत या आमदारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगत पक्षाने या आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतलेल्या अशोक चव्हाणांच्या भेटीची चर्चा सुरु असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या वाटेवर
अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. येत्या आठवड्यात हे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.





