धाराशिव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुळजापूर दौऱ्यादरम्यान मोठा गदारोळ झाला. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र जितेंद्र आव्हाड हे दिशाभूल करत असल्याचे सांगत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी आव्हाड यांना मंदिराबाहेर अडवले. त्यामुळे मंदिराबाहेरच आव्हाड समर्थक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिराची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मंदिराच्या विकासाला विरोध नाही. पण ऐतिहासिक वास्तूंना धक्का लागू देणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी करत आव्हाड यांची गाडी अडवली. आव्हाड यांनी हिंदू धर्म आणि देवीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. या गोंधळामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ तणाव होता. भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांची गाडी अडवल्यानंतर, आव्हाड समर्थकही पुढे आले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले की, “जितेंद्र आव्हाड यांनी कुठलीही माहिती न घेता तुळजापूर शहर आणि मंदिराची बदनामी केली आहे. तुळजाभवानीचे शिखर पाडले जाणार नाही, गाभाराही पाडला जाणार नाही. तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड हे प्रसारमाध्यमांतून चुकीची माहिती देऊन तुळजाभवानी मंदिराचीची बदनामी करत आहेत,” असा दावा भाजपकडून करण्यात आला. दरम्यान, आंदोलक आणि पोलीस यांच्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जितेंद्र आव्हाड आंदोलनकर्त्यांना भेटून निघून गेले. एकंदरीत आव्हाड यांचा तुळजापूर दौरा वादग्रस्त ठरला असून पोलीस प्रशासनाकडून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.