Jejuri News : भाविकांची लूट थांबणार का? जेजुरी नगरपरिषदेच्या ‘त्या’ वाहन करावरून नगरसेवक आक्रमक
Jejuri News : वाहनतळ नसताना कर वसुली कशासाठी? भाजप नगरसेवक गणेश डोंबे यांचा प्रशासनाला सवाल.

Jejuri News – जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने दर वर्षी वाहन प्रवेश कराचा ठेका देण्यात येत आहे. ठेकेदारामार्फत वाहन प्रवेश कर वसूल केला जातो. मात्र, नगरपरिषदेचे वाहन तळ नाही. त्यामुळे भाविकांना खासगी वाहनतळाचा आश्रय घ्यावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने प्रथमतः वाहन तळ निर्माण करावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक गणेश डोंबे यांनी केली आहे.
दैनिक प्रभातमध्ये वाहन प्रवेश कराचा ठेका तब्बल ३ कोटी रुपयांना, असे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षाचे नगरसेवक गणेश डोंबे म्हणाले की, वाहनतळाजवळ बहुतांश ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत. पिण्याचे पाणी नाही. विशेषतः महिला भाविकांची फार कुचंबणा होत आहे.
खासगी वाहन तळाचे पैसे वेगळे मोजावे लागतात. बहुतांश भाविक वाहन प्रवेश कर भरल्यानंतर वाहने कुठेही रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या शहरवासीयांच्या घरासमोर उभी करतात. त्यातून हमरीतुमरी होत आहे. विशेषतः जत्रा- यात्रा उत्सव काळात हे प्रकार नित्याचेच आहेत. जेजुरीत प्रवेश करताच भाविकांना खिशात हात घालावा लागतो.
देवदर्शन होईपर्यंत सर्वच ठिकाणी पैसे मोजावे लागतात. कऱ्हा स्नानासाठी भाविकांची वाहने मल्हार सागर जलाशयावर गेल्यास तेथेही प्रवेश कर भरावा लागतो. सुविधा मात्र काहीही नाहीत. त्याकडे सुद्धा तत्सम प्रशासन व्यवस्थेने लक्ष देणे गरजेचे आहे. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स लावण्याचा ठेका एका खासगी व्यवसायिक व्यक्तीला दिला आहे.
मात्र, सामाजिक जनहिताच्या फ्लेक्स लावला तरी त्यासाठी कर आकारणी होत आहे. सामाजिक जनहिताच्या सूचना व प्रबोधनात्मक फ्लेक्स लावल्यास कर आकारणीतून त्यांना सूट देण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे करणार असल्याचे नगरसेवक डोंबे यांनी सांगितले.





