मोई येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जीवन येळवंडे, उपाध्यक्षपदी मनिषा गवारी यांची बिनविरोध निवड

चिंबळी : मोई (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी जीवन येळवंडे आणि उपाध्यक्षपदी मनिषा गवारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेचे सचिव निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली.
संस्थेच्या इतर संचालकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गवारी आणि उपाध्यक्षा सुरेखा करपे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी चाकण येथील संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एम. पी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी जीवन येळवंडे आणि उपाध्यक्षपदासाठी मनिषा गवारी यांनी सर्वानुमते अर्ज दाखल केले. कोणताही विरोधी अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा एम. पी. राऊत यांनी केली.
या प्रसंगी संस्थेचे संचालक भगवान साकोरे, समीर गवारी, संभाजी करपे, ज्ञानेश्वर गवारी, सुरेखा करपे, जालिंदर गवारी, रवींद्र गवारी, कानिफनाथ गवारी, गोरख फलके, चेतन गवारी यांच्यासह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सर्व संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.





