सीपी राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदी निवडीबद्दल जगदीप धनखड यांची पहिली प्रतिक्रिया, पत्रातून मोकळं केलं मन

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपति निवडणुकीत विजय मिळवला असून, ते भारताचे नवे उपराष्ट्रपति बनले आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ७८१ पैकी ७६७ मतदारांनी (एक टपाल मतपत्रिका) मतदान केले, यापैकी १५ मते अवैध ठरली. मतदान मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत पार पडले.
जगदीप धनखड यांच्याकडून अभिनंदन –
माजी उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनी राधाकृष्णन यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आदरणीय राधाकृष्णनजी, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आणि मानवतेच्या सहाव्या हिस्स्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या उपराष्ट्रपति पदावर तुमची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या सन्माननीय पदावरील तुमची नियुक्ती देशातील प्रतिनिधींचा विश्वास दर्शवते. तुमच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभवामुळे या पदाला निश्चितच अधिक सन्मान आणि गौरव प्राप्त होईल. या महत्त्वपूर्ण प्रसंगी तुमच्या यशस्वी कारकीर्दीसाठी आणि आपल्या महान राष्ट्राच्या सेवेसाठी माझ्या शुभेच्छा.”
Former Vice President Jagdeep Dhankhar greets his successor CP Radhakrishnan. pic.twitter.com/m6WorHvNWJ
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. त्यांनी X वर लिहिले, “राधाकृष्णन यांचे जीवन नेहमीच समाजसेवा आणि गरीब तसेच उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी समर्पित राहिले आहे. ते आपल्या संवैधानिक मूल्यांना बळकटी देतील आणि संसदीय संवादाला पुढे नेतील.”
काँग्रेसचा दावा: नैतिक पराभव
काँग्रेसने दावा केला की, उपराष्ट्रपति निवडणुकीत भाजपला संख्यात्मक विजय मिळाला असला, तरी नैतिक आणि राजकीयदृष्ट्या त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “विरोधी पक्ष या निवडणुकीत एकजूट राहिला आणि त्याचे प्रदर्शन अत्यंत सन्मानजनक होते. विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ४० टक्के मते मिळाली, तर २०२२ च्या उपराष्ट्रपति निवडणुकीत विरोधी पक्षाला २६ टक्के मते मिळाली होती.”
निवडणुकीचे निकाल –
राधाकृष्णन यांना प्रथम प्राधान्याची ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली उपराष्ट्रपति पदाचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




