JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

बंगळुरू – माजी पंतप्रधान देवेगौडा आणि त्यांचे पुत्र व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची स्थिती सध्या बिकट असल्याचे दिसते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षात प्रचंड नाराजी असून अनेक नेत्यांनी पक्षांतर करण्यास सुरूवात केली आहे.
आता या नाराज नेत्यांच्या यादीत कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहीम यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. तेही देवेगौडा पिता-पुत्रावर नाराज आहेत. तथापि, आपण निवडून आलेले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दिल्लीत बैठक झाली याचा अर्थ भाजपसोबत आघाडी झाली असा होत नाही असा दावाही इब्राहीम यांनी केला आहे. ते म्हणाले की आपण अशा बैठकांना महत्व देत नाही आणि इतर नेत्यांप्रमाणे पक्षातून बाहेरही जाणार नाही. पक्षात राहुनच आपण लढा देणार आहे असे नमूद करत त्यांनी सांगितले की पक्षाचे नेते के. ए. सिप्पेस्वामी यांनी भाजपसोबतच्या दिल्लीतील बैठकीबाबत सांगितले तोपर्यंत मला याची कल्पनाही नव्हती.
दरम्यान, इब्राहीम यांनी येत्या 16 तारखेला पक्षाच्या नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. त्यात पुढे काय करायचे याचा निर्णय त्यांच्याकडून जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. भाजपशी हातमिळवणी केल्यापासून देवेगौडा यांच्या पक्षात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मात्र पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला अशी भूमिका देवेगौडा यांनी मांडली आहे. तसेच भाजपसोबत गेलो याचा अर्थ आपली धर्मनिरपेक्षतेची मूल्ये सोडली आहेत असा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण सत्तेसाठी हापापलेलो नाही व संधीसाधू राजकारणही करत नसल्याचा दावा त्यांनी केला होता.





