रेवण्णा पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ; एसआयटीकडून आरोपपत्र दाखल

बेंगळुरू – जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध बलात्कार आणि त्यांचे वडील आणि आमदार एचडी रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले आहे. वेगवेगळ्या प्रकरणात आणखीही काही आरोपपत्रे दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
प्रज्वलच्या प्रकरणात एसआयटीने दोन हजार पानांचे आरेापपत्र दाखल केले असून सुमारे १५० साक्षीदारांच्या जबाबांचा त्यात समावेश आहे.प्रज्वल रेवण्णाने अक्षरश: शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्याचे तीन हजार व्हिडीओही उपलब्ध आहेत. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र, कुटुंबातील एका घरगुती नोकरावर कथित लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणाशी संबंधित आहे.या प्रकरणाच्या स्पॉट इन्स्पेक्शन मध्ये जैविक, भौतिक, वैज्ञानिक, मोबाईल, डिजिटल आणि इतर संबंधित पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तज्ञांचे मत घेण्यात आले, असे एसआयटीने म्हटले आहे.
प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातु असून त्यांचा आमदार असलेला मुलगाही यात आरोपी आहे. वडील-मुलांच्या विरोधात पहिली तक्रार त्यांच्या राहत्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली आहे. आमदाराची पत्नी भवानी हिची नातेवाईक असलेल्या पीडितेने आरोप केला आहे की, तिचा अनेकदा लैंगिक छळ करण्यात आला. प्रज्वल यांने नुकतीच हसन मतदार संघातून भाजप जेडीएस युतीचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात तो पराभूत झाला आहे.





