Jayant Patil : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा या ग्रंथांबद्दल केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी हे विधान अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक असल्याचे सांगत, स्वामींनी याप्रकरणी तातडीने माफी मागावी अशी मागणी केली. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले की, ज्ञानेश्वरी, भागवत आणि संत नामदेव व संत तुकाराम महाराजांचे अभंग ही केवळ भाष्ये किंवा संकलन नसून, ती स्वतंत्र आणि क्रांतिकारी विचारधारा मांडणारी शास्त्रे आहेत. या ग्रंथांनी महाराष्ट्राला समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला असून ते राज्याच्या आध्यात्मिक परंपरेचा कणा आहेत. अशा महान ग्रंथांना दुय्यम ठरवणे हा केवळ वारकरी संप्रदायाचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवमान आहे. जयंत पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, अशा विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कोट्यवधी वारकरी भाविकांच्या भावना या विधानामुळे दुखावल्या गेल्या असून, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. वारकरी पंथाने नेहमीच सामाजिक परिवर्तनासाठी काम केले आहे, त्यामुळे त्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीने आपले विधान मागे घेऊन जाहीर माफी मागितली पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. या विषयावर वारकरी संप्रदायातूनही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. जयंत पाटील यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर सभागृहात चर्चा रंगली असता, राज्य सरकारकडून यावर अधिकृत निवेदन दिले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.