Jayant Patil on Gopichand Padalkar : “दिवा विझताना मोठा होतो, तशी जयंत पाटलांची अवस्था”; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दिवा विझताना मोठा होतो, तशीच सध्या जयंत पाटलांची अवस्था आहे”, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत पडळकर बोलत होते.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरीयस वाटत नाही. ते जबाबदारीपासून का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे.
“जयंत पाटील यांचं राजकारण आता संपुष्टात आलं आहे. ते कुठलाही संघर्ष न करता केवळ अनुकंपेवर राजकारणात आले. सांगलीसाठी त्यांनी कोणताही ठोस प्रकल्प आणलेला नाही. ते केवळ व्हीआयपी कॅबिनेट मंत्री राहिले. आता त्यांच्या टायरचं पंक्चर नाही, तर तो फुटलाय, त्यामुळे पूर्ण बदल आवश्यक आहे,” असं उपहासात्मक वक्तव्यही पडळकरांनी केलं.
धनगर समाजासाठी रायगडावर पक्की घरं हवीत
रायगडावरील धनगर समाजाच्या घरांवरूनही पडळकरांनी सरकारला खडसावलं. “स्वराज्यात धनगर समाजाचा मोठा वाटा होता. रायगडावर त्यांची जबाबदारीही मोठी होती. आता त्याच समाजाला रायगडावरून हुसकावलं जात आहे. पुरातत्व खात्याने दिलेल्या नोटीसा फाडून टाका,” असा आक्रमक इशारा देत त्यांनी लवकरच रायगडावर जाणार असल्याचं जाहीर केलं.
बच्चू कडूंना दिला फडणवीसांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आमदार बच्चू कडूंनाही त्यांनी सल्ला दिला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. त्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा,” असं म्हणत त्यांनी संवादानेच प्रश्न सुटतील, हेही स्पष्ट केलं.





