Anshuman Gaekwad : जय शहांचा मोठा निर्णय! कॅन्सरशी लढा देणाऱ्या अंशुमन यांना BCCI तर्फे 1 कोटीची मदत जाहीर…

BCCI & Anshuman Gaekwad :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेल्या माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या भावनिक आवाहनानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे, ज्यांनी गायकवाड यांना क्रिकेट बोर्डाला मदत करण्याची विनंती केली होती.
सचिव जय शहांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कर्करोगाशी झुंज देत असणाऱ्या माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गायकवाड यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पुढे ते भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील झाले होते. दरम्यान, विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला ‘ब्लड कॅन्सर’ने ग्रस्त असलेल्या अंशुमन गायकवाडला मदत करण्याचे आवाहन केले होते. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयला मदतीची विनंती करण्याव्यतिरिक्त, माजी भारतीय कर्णधाराने उपचारासाठी आपली पेन्शन दान करण्याचे आश्वासन देखील दिले होते. आता बीसीसीआयने कपिल देव यांच्या मागणीची दखल घेतली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने सांगितले की, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जय शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.





