Javed Akhtar: अँटी नॅशनलिस्ट बिरूद पद्मभूषण पुरस्कार माना
Javed Akhtar:

गीतकार जावेद अख्तर यांना अखिल भारतीय समता पुरस्कार प्रदान
Javed Akhtar: शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन आणि सरकारी शाळा बंद हे सरकारचे दुटप्पी धोरण आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराबाबत तुम्ही आग्रही राहिल्यास तुम्हाला अँटी नॅशनलिस्ट ठरवले जाते. आपल्या अधिकारांबाबत आग्रही रहा आणि अँटी नॅशनलिस्ट हे बिरूद पद्मभूषण पुरस्कार माना, असा रोखठोक सल्ला ज्येष्ठ विचारवंत, कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आज दिला.
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा २३ वा राष्ट्रीय समता पुरस्कार जावेद अख्तर यांना शनिवारी प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
समता भूमी, फुले वाडा येथे झालेल्या कार्यक्रमास समता परिषदेचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, डॉ. स्नेहा सोनकाटे आदीसह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, अभिनेते नाना पाटेकर, खासदार रामराव वडकुते आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जावेद अख्तर म्हणाले की, कठीण काळात शेणाचे गोळे आणि दगडांचा मारा सहन करून, शिक्षणाच्या माध्यमातून समाज उत्थानेचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत जावेद अख्तर प्रतिभावान कवी, प्रभावी गीतकार, समर्थ पटकथालेखक आणि निर्भीड सामाजिक विचार मांडणारे लेखक आहेत. चित्रपटांतून त्यांनी सामान्य माणसाचा संघर्ष, अन्यायाविरुद्धचा संताप आणि व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याचे धाडस प्रभावीपणे मांडले आहे. महात्मा फुले यांचे टपाल तिकीट व नाणे तयार करण्याचा प्रस्ताव तयार आहे.
फुले दांपत्याचे साहित्य ५० रुपयांत उपलब्ध करून देणार आहे. फुले यांचे सर्व साहित्य सात भाषांत अनुवादित करणार असून टपाल शिक्क्यावर फुलेवाड्याची मोहोर उमटणार आहे. फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणासाठी २०० कोटी मंजूहोणार आहेत.
यावेळी किक बॉक्सिंगध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवलेल्या उत्कर्षा शिंदे या चिमुकलीचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन नागेश गवळी यांनी केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.





