Jasprit Bumrah : बुमराहचा विमानतळावर दिसला ‘अँग्री’ अवतार! फोन हिसकावत फॅनला शिकवला धडा, पाहा VIDEO

Jasprit Bumrah snatches fans phone : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या मैदानावरील भेदक गोलंदाजीसाठी आणि मैदानाबाहेरील शांत स्वभावासाठी ओळखला जातो. प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा बुमराह खऱ्या आयुष्यात कमालीचा ‘कूल’ मानला जातो. मात्र, सध्या सोशल मीडियावर बुमराहचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये तो एका चाहत्यावर प्रचंड संतापलेला पाहायला मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विमानतळावरील आहे. जसप्रीत बुमराह विमानतळावर चेक-इनसाठी रांगेत उभा होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने बुमराहची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन केला आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. ही बाब बुमराहच्या लक्षात येताच त्याने त्या चाहत्याला रोखले आणि व्हिडीओ थांबवण्यास सांगितले.
What an arrogant behavior by Jasprit Bumrah. First he threatened his fan that he would throw his phone, and later he snatched the fan’s phone. pic.twitter.com/O2e4jSLw7s
— 𝐆𝐨𝐚𝐭𝐥𝐢𝐟𝐢𝐞𝐝 👑 (@Goatlified) December 17, 2025
तरीही तो चाहता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. व्हिडीओमध्ये त्यांच्यातील संवाद स्पष्ट ऐकू येत आहे. चाहता म्हणाला, “सर, मी तर तुमच्यासोबतच जाणार…”, त्यावर बुमराहने त्याला इशारा देत म्हटले की, “मोबाईल जर पडला, तर मला बोलायचं नाही.” बुमराहने समजावून सांगूनही त्या चाहत्याने “काही नाही होत सर…” म्हणत व्हिडीओ सुरूच ठेवला. अखेर संयम सुटलेल्या बुमराहने त्या चाहत्याचा मोबाईल थेट हातातून हिसकावून घेतला.
सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा –
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काही चाहत्यांच्या मते, खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर राखला पाहिजे आणि बुमराहने जे केले ते योग्यच होते. तर दुसरीकडे, बुमराहने चाहत्यासोबत इतक्या आक्रमकपणे वागायला नको होते, असे मत काही जणांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना रद्द! आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं
बुमराहची अलीकडील कामगिरी –
जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर टी-२० मालिकेत त्याचे संघात पुनरागमन झाले. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, मुल्लानपूर येथील दुसऱ्या सामन्यात तो महागडा ठरला. त्याने ४५ धावा खर्च केल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा विश्रांती देण्यात आली होती.





