Sri Lanka Cricket appointed fielding coach R. Sridhar : आगामी आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे यजमानपद भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे भूषवणार आहेत. या मोठ्या स्पर्धेपूर्वी आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी श्रीलंका क्रिकेटने (SLC) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारताचे माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांची श्रीलंकेच्या नवीन फिल्डिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड कप २०२६ पर्यंतची जबाबदारी – श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, आर. श्रीधर यांचा कार्यकाळ ११ डिसेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि तो १० मार्च २०२६ पर्यंत, म्हणजेच टी-२० वर्ल्ड कप संपेपर्यंत असेल. आगामी पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या दौऱ्यांमध्ये ते श्रीलंकन खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचे धडे देतील. या नियुक्तीमुळे श्रीलंकेच्या फिल्डिंगमध्ये मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा बोर्डाला आहे. भारतीय संघासोबतचा प्रदीर्घ अनुभव – आर. श्रीधर हे बीसीसीआय लेव्हल-३ पात्र प्रशिक्षक आहेत. २०१४ ते २०२१ या सात वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच म्हणून काम पाहिले आहे. या काळात ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी टीम इंडियाला मार्गदर्शन केले. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात आमूलाग्र बदल झाला आणि भारत जगातील सर्वोत्तम फिल्डिंग युनिटपैकी एक बनला. हेही वाचा – IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना रद्द! आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं श्रीलंकेच्या फिल्डिंगला मिळणार नवी धार – आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना श्रीधर म्हणाले, “श्रीलंकन खेळाडूंमध्ये नैसर्गिक प्रतिभा आणि जबरदस्त जिद्द आहे. माझे उद्दिष्ट केवळ एखादी नवी सिस्टीम लादणे नसून, संघात असे वातावरण निर्माण करणे आहे जिथे खेळाडूंची चपळता आणि क्षेत्ररक्षण कौशल्ये अधिक विकसित होतील.” यापूर्वी त्यांनी श्रीलंकेच्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये १० दिवसांचा विशेष कार्यक्रमही राबवला होता. हेही वाचा – Hardik Pandya : ‘हार्दिक हा जगातील…’, इरफान पठाणच्या प्रश्नाला लाईव्ह शोमध्ये उत्तर देताना ‘या’ अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट खेळाडू ते यशस्वी प्रशिक्षक – आर. श्रीधर यांचे पूर्ण नाव रामकृष्णन श्रीधर असून ते स्वतः एक प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राहिले आहेत. १९८९ ते २००१ दरम्यान त्यांनी हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना ३५ प्रथम श्रेणी आणि १५ लिस्ट-ए सामने खेळले. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी भारतीय वरिष्ठ संघासह १९ वर्षांखालील (U-19) संघालाही प्रशिक्षण दिले आहे.