Jason Roy Dismissal : अति-हुशारी अंगलट आली! भलताच शॉट खेळायला गेला अन् थेट दांडी उडाली; जेसन रॉयच्या विकेटचा VIDEO व्हायरल
Jason Roy Dismissal : युरोपियन टी-२० लीगमध्ये जेसन रॉय आपल्या अतिहुशारीने क्लीन बोल्ड झाल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Jason Roy Bizarre Dismissal European T20 League 2026 Video Viral : आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज नवनवीन आणि अतरंगी शॉट्स खेळून गोलंदाजांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कधीकधी हीच अति-हुशारी फलंदाजांच्या अंगलट येते. असाच काहीसा विचित्र प्रकार युरोपियन टी-२० लीगच्या पहिल्या हंगामात पाहायला मिळाला. ग्लासगो कॉस्मिक आणि डब्लिन गार्डियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) एका विचित्र शॉटच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याच्या या अनाकलनीय विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूवर विचित्र फटका; रॉयने गमावली मोठी विकेट –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ग्लासगो कॉस्मिकसाठी जेसन रॉयने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने केवळ ३६ चेंडूंत ६० धावा कुटल्या होत्या. मात्र, डावाच्या १६व्या षटकात वेगवान गोलंदाज मॅथ्यू होलार्डने ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर रॉयने स्टंप सोडून ऑफ साईडला सरकत यष्टींच्या मागून फाइन लेगकडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागून थेट स्टंपच्या वरच्या भागावर (Bails) जाऊन आदळला आणि तो विचित्रपणे बोल्ड झाला. रॉयने ३७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या, तर ग्लासगोने ५ बाद १८३ धावांचा डोंगर उभारला.
लुंगी एन्गिडीची भेदक गोलंदाजी; डब्लिनचा डाव १५० धावांवर गुंडाळला –
A perfect timed shot………….
………..goes & get’s Jason Roy out 🥲#ETPL pic.twitter.com/e2kacXx9CU
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) August 29, 2026
ग्लासगो कॉस्मिकने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डब्लिन गार्डियन्सचा संघ १९.३ षटकांत १५० धावांवरच गारद झाला. दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने अवघ्या २१ धावांत ४ विकेट्स टिपत डब्लिनच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याला पॉल व्हॅन मीकेरेनने ३ विकेट्स घेत अप्रतिम साथ दिली.
ग्लासगो कॉस्मिकचा ३३ धावांनी विजय; स्पर्धेत उघडले विजयाचे खाते –
पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर ग्लासगो कॉस्मिकने या सामन्यात ३३ धावांनी धमाकेदार विजय नोंदवत स्पर्धेतील पहिले गुण मिळवले. जेसन रॉयची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर ग्लासगोने सामन्यावर पूर्ण पकड ठेवली. मात्र, संपूर्ण सामन्यात जेसन रॉयच्या त्या विचित्र बाद होण्याचीच चर्चा सर्वाधिक रंगली.





