Japan Open 2024 : सतीश कुमारची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक, दुहेरीत भारताच्या पदरी निराशा…

Japan Open 2024 (Sathish Kumar Karunakaran) : भारतीय बॅडमिंटनपटू सतीश कुमार करुणाकरनने बुधवारी जपान ओपनच्या पुरुष एकेरीची उप-उपांत्यपूर्व (प्री-क्वार्टर फायनल) फेरी गाठली. पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर सतीशने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 23 वर्षीय भारतीय खेळाडू 6-1 ने आघाडीवर असताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँटोन्सनने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला माघार घेण्याचा निर्णय घेतला.
जागतिक क्रमवारीत 47व्या स्थानावर असलेल्या सतीशसमोर आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या केंटाफोन वैंगचेरोएन याचे आव्हान असणार आहे. हा सामना गुरूवारी (22 आॅगस्ट) सकाळी 8.10 वाजल्यापासून सुरू होईल.
दुहेरीत भारताच्या पदरी निराशा…
दुसरीकडे याच स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किरण जॉर्जला जपानच्या केंटा सुनेमाविरुद्ध 19-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमित रेड्डी आणि सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरी जोडीची मोहीमही संपुष्टात आली आहे. डेन्मार्कच्या जेस्पर टॉफ्ट आणि अमेली मॅग्लंड यांच्याविरुद्धच्या पहिल्या फेरीत या जोडीने सामन्यादरम्यानच माघार घेतली.
महिला दुहेरीत रितुपर्णा पांडा आणि श्वेतापर्णा पांडा यांनाही पहिल्या फेरीत ज्युली फिन इप्सेन आणि माई सुरो या डॅनिश जोडीविरुद्ध 34 मिनिटांताच 8-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेला एकही भारतीय खेळाडू जपान ओपन स्पर्धेत खेळत नाही.





