पिंपरी | जान्हवी नवले यांचे यूपीएससी परीक्षेत यश

हिंजवडी, (वार्ताहर) – विद्येचे माहेरघर म्हणून जगभरात नावलौकिक कमविलेल्या पुण्यातील ताथवडे गावच्या रहिवासी जान्हवी सुमेश नवले यांनी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत सलग दुसर्यांदा यश मिळविले आहे. त्यांचा देशात खुल्या प्रवर्गात 145 वा क्रमांक आला आहे. त्यामुळे त्यांनी मिळविलेल्या या देदीप्यमान यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जान्हवी या माजी खासदार व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नातसून आहेत. त्यांचे पती सुमेश नवले हे नोविगो या आंतरराष्ट्रीय अमेरिकन आयटी कंपनीमध्ये सीनियर मॅनेजर आहेत. त्यामुळे कुस्ती व राजकीय क्षेत्रात नवले कुटुंबाचा नावलौकिक असला तरी आता उच्चपदस्थ अधिकर्यांच्या श्रेणीत नवले कुटुंबाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील चास गावचे सुपुत्र आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बाळासाहेब शेखर पाटील यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे माहेरी घरातूनच त्यांना आई डॉ. विद्युलता (इ.ए. एश्रशलीं. झहऊ) आणि डॉ. बाळासाहेब शेखर पाटील (खझड) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
जान्हवी नवले यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात सिव्हिल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी सन 2016 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली.
2020 मध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये त्यांनी चांगले यश मिळविले. त्यावेळेस त्यांची कलेक्टर म्हणून निवड झाली असून त्या दिल्ली येथे सध्या कार्यरत आहेत. घरप्रपंच व नोकरी करत त्यांनी पुन्हा 2023 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. त्या देशात 145 क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यामुळे जान्हवी यांच्यासह नवले कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा प्रवास खूप आव्हानात्मक असतो. या प्रवासात मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कणखर राहणे गरजेचे असते. वडील आयपीएस असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. अभ्यासात सातत्य राखल्याने दुसर्यांदा यश मिळविता आले. या यशात माहेर व सासरच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रोत्साहन देत भक्कमपणे साथ दिली. त्यामुळेच हे यश साध्य करता आले. – जान्हवी सुमेश नवले.





