Janhvi Kapoor : जाह्नवी कपूर लालबागच्या राजाच्या दरबारात; पारंपरिक लुकमध्ये जिंकले चाहत्यांचे मन

Janhvi Kapoor : गणेशोत्सवाच्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात बाप्पाच्या जयघोषाने जल्लोष सुरू आहे. मुंबईतील लालबागचा राजा हा गणेशोत्सवातला सर्वात प्रसिद्ध मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे दर्शनासाठी चाहत्यांसोबत बॉलिवूड कलाकारांचीही रांग लागली आहे. गुरुवारी अभिनेत्री जाह्नवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते.
जाह्नवी आणि सिद्धार्थ यांनी आगामी “परम सुंदरी” या चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे जाह्नवी कपूरचा पारंपरिक लुक. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली लाल रंगाची साडी, जाड सोन्याच्या बॉर्डरने सजवलेली, फुलांच्या नक्षीकामाने उठून दिसत होती. या साडीसोबत तिने डीप नेक ब्लाऊज, कानात नवरत्नजडित झुमके, हातात कंगन, कपाळावर लाल बिंदी, मराठमोळी नथ आणि मोठी वेणी असा लूक धारण केला होता. तिच्या या लूकमुळे चाहत्यांनी तिला “दुल्हनसारखा अंदाज” असे संबोधले.
सिद्धार्थ मल्होत्राही साध्या पारंपरिक पोशाखात दिसला. दोघेही लालबागच्या राजाच्या भव्य मूर्तीसमोर हात जोडून उभे असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. जाह्नवीने आपल्या इन्स्टाग्रामवर हे क्षण शेअर करत “गणपती बाप्पा मोरया” असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्याने तिला “देवी जाह्नवी” अशी उपमा दिली, तर दुसऱ्याने लिहिले की, “साडीमध्ये तुम्ही अप्रतिम दिसत आहात.”
लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर दोन्ही कलाकारांच्या चित्रपटाला शुभेच्छा मिळतील, असा विश्वास फॅन्सनी व्यक्त केला आहे. “परम सुंदरी” या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला असून त्यातील भावनिक प्रसंग आणि गाणी प्रेक्षकांना भावली आहेत. हा चित्रपट २९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी शिर्डीत आणि आता मुंबईत बाप्पाच्या दर्शनाने दोघांनी आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन केले असून, यामुळे त्यांच्या चित्रपटाला चांगली सुरुवात मिळेल अशी अपेक्षा आहे.
गणेशोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय ठरते आणि यंदाही जाह्नवी-सिद्धार्थच्या पारंपरिक दर्शनामुळे उत्सवाचा आनंद अधिक खुलला आहे.





