Lalbaugcha Raja | अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. लालबागच्या राजाची देखील शेवटची आरती संपन्न झाली आहे. यानंतर लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. यादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आढळून आली आहे.
लालबागचा राजाच्या पायाशी ठेवलेल्या या चिठ्ठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी यांचा चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी चिठ्ठी ठेवण्यात आली. लालबागचा परिसर हा शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. ठाकरे गटाचे अजय चौधरी हे सध्या शिवडीचे आमदार आहेत.
चिठ्ठीत काय लिहिले आहे?
मात्र, लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलेल्या चिठ्ठीत सुधीर साळवी 2024 ला आमदार होऊ दे, असे लिहण्यात आले होते. साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे समजते. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार… सुधीर (भाऊ) साळवी’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहण्यात आला आहे.
सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. ते लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील आहेत. अजय चौधरी यांच्यासोबतच सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता अजय चौधरी की सुधीर साळवी कोणाला दिली संधी दिली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.