पिंपरी | हिंदुंच्या सुरक्षेसाठी पिंपरीत जनगर्जना मोर्चा

पिंपरी, (प्रतिनिधी) – बांगलादेशात हिंदूंवर तसेच हिंदू मंदिरांवर होणा-या हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे शहरात हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. आज रविवारी (दि. १८) सकाळी चिंचवड येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्या केल्या. बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या होत आहेत.
हे थांबविण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. सीएए कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी.
पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत, याचे सर्वेक्षण तातडीने करावे. त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो.
त्यांच्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे. भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. बांगलादेशी मुसलमान घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




