बांगलादेशात हिंदूंवर हल्ले: अमरिकेतील हिंदूंनी व्हाईट हाऊस ते यूएस कॅपिटलपर्यंत काढला निषेध मोर्चा

वाॅशिंग्टन – बागलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ अमरिकेतील हिंदूंनी विराट निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलपर्यंतच्या या मोर्चामध्ये अमेरिकेतील हजारो हिंदू नागरिक सहभागी झाले होते.
शांततामय मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चातील सहभागी नागरिकांनी बायडेन प्रशासनाला आणि भावी ट्रम्प प्रशासनाला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. हिंदूंचे रक्षण करावे आणि हिंदूंवरील हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यास बांगलादेशातल्या नवीन सरकारला सांगण्याचे आवाहन यावेळी हिंदू समुदायाकडून करण्यात आले.
सोमवारी झालेल्या या मोर्चामध्ये स्टॉप हिंदू गनोसाईड. ओआरजी, बांगलादेशी डायस्पोरा ऑर्गनायजेशन्स आणि हिंदू ऍक्शन्स या संघटनांनी अमेरिकेतील कंपन्यांनी बांगलादेशातील कपडे खरेदी करणे थांबवण्याची देखील मागणी केली. बांगलादेशातील वस्त्रोद्योग निर्यातीसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आले.
हिंदूंवरच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी हा मोर्चा नाही. हल्ल्यांचे उत्तरदायित्व घेतले जावे, भारतीय उपखंडातील हिंदूंचा मोठा पाठिंबा बांगलादेशातील हिंदूंना आहे, असे संयोजकांनी सांगितले.
जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जाते. वित्तीय संस्था सामाजिक न्याय धोरण राबवतात. या वित्तीय संस्थांनीही सामाजिक न्याय धोरण राबवण्यास बांगलादेश सरकारला सांगावे, अशी मागणीही यावेळी केली गेली. दरम्यान बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा जगभरातील हिंदू बांधवांकडून निषेध करण्यात येत आहे.





