Nagar : बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरिता तातडीने उपाययोजना करा

संगमनेर : बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत असून यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहे. आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भारत व बांगलादेश सरकारमधील उच्च अधिकाऱ्यांना तातडीने पत्र लिहून व योग्य राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील हिंदू समाजाला मानवतावादी मदत आणि समर्थन देण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा. हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे . बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदू धर्मियांना त्रास दिला जात यामुळे तेथील हिंदू धर्मीय असुरक्षित झाले आहे.कट्टरतावादी अनेक नेते बेताल वक्तव्य करून हिंदू धर्मा विरोधी चिथावणी देत आहे.
यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत. यामुळे तेथील हिंदू बांधव- महिला अत्यंत भयभीत वातावरणात आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू धर्मियांचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने तातडीने पुढाकार घेऊन तेथील हिंदू समाजाला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपाययोजना करून तेथील हिंदू धर्मियांना दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.





