Jan Adhikar Party: पप्पू यादव यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन

नवी दिल्ली/ पाटणा – बिहारचे माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांचा जन अधिकार पार्टी हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन करण्यात आला आहे. तसेच पप्पू यादव बिहारच्या पूर्णिया मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशीही माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची जोरदार प्रशंसा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलिनिकरणाच्या प्रक्रियेत प्रियंका गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
माध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की हे पूर्णत: भावनिक नाते आहे. आम्ही एकत्र बसलो होतो. सीमांचल आणि मिथीलांचल येथे कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला रोखण्याचे आमचे ध्येय आहे. तेजस्वी यादव यांनी १७ महिने सरकारमध्ये काम केले आहे आणि विश्वास निर्माण केला आहे तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकांची मने जिंकली आहेत व नवी आशा जागवली आहे.
आम्ही सगळे एकत्रितपणे केवळ लोकसभेची निवडणुकच नाही तर २०२५ मध्ये होणारी विधानसभेची निवडणूकही जिंकणार आहोत.
पप्पू यादव पुढे म्हणाले की त्यांच्यासाठी पूर्णिया महत्वाचे नाही तर भारतीय जनता पार्टीला रोखणे अधिक महत्वाचे आहे. भाजपच्या विचारधारेच्या विरोधात आम्हाला लढायचे आहे. समाजातील दुर्बल घटक कोण आहेत याची निश्चिती करून त्यांना संरक्षण प्रदान करायचे आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वासोबत आम्हाला काम करायचे आहे. त्यांनी देशाचे मन जिंकले आहे व तेच देशाचे पंतप्रधान होतील.
दरम्यान पप्पू यादव आणि लालू यादव यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पूर्णियासोबतच सीमांचल आणि कोसी क्षेत्रातील जागांबाबतही चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत पप्पू यादव आणि कॉंग्रेसमधील जवळीकही वाढली होती. त्यांच्या पत्नी रंजित रंजन या कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्याही आहेत. त्यापूर्वी त्या राष्ट्रीय जनता दलाकडून सुपोल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
पप्पू यादव यांची कॉंग्रेसशी चर्चा सुरू होती. मात्र काही निश्चित होत नव्हते. आता त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन झाला आहे. त्यांचे पुत्र सार्थक यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमध्ये आघाडीची ताकद वाढण्याचे संकेत देणारी ही घटना आहे.





