Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शेतकऱ्यांची कमाल ; ‘या’ पिकाच्या उत्पादनातून मिळवला ६ कोटींचा नफा

Jammu and Kashmir : आजकाल शेतीत कमाई होत नसल्याची चर्चा अनेकदा होते पण जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चमत्कार केला आहे. उधमपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तिथल्या वातावरणात वेगळा प्रयोग करून कोटींचा नफा कमावला आहे. याशेतकऱ्यांनी मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करत सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
उधमपूरच्या शेतकऱ्यांनी तब्बल 3,000 क्विंटलपेक्षा जास्त मशरूमचे उत्पादन घेतले आहे. यातून त्यांना एकूण 6 कोटींहून अधिक नफा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मशरूम उत्पादक शेतकरी सोम सिंग यांनी चौकटीबाहेर जाऊन शेती करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे. याविषयी सोम सिंग यांनी “मी सरकार आणि कृषी विभागाच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. मशरूम शेती ही तरुणांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. मी त्यांना हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करतो.” असे त्यांनी म्हटले आहे.
उधमपूर जिल्ह्याचे मुख्य कृषी अधिकारी संजय आनंद यांनी सोम सिंग यांच्या प्रयोगाचे कौतुक करत, “चालू वर्षात आम्ही सुमारे 1 लाख पोती मशरूमची लागवड केली आहे. आम्ही आमच्या नेटवर्कमध्ये सुमारे 500 नवीन उत्पादक जोडले आहेत. उधमपूर जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक पिशव्या मशरूमची लागवड करण्यात आली असून, त्यातून 3,000 क्विंटलपेक्षा जास्त मशरूमचे उत्पादन झाले आहे. “यामुळे उधमपूरच्या शेतकऱ्यांना 6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.”
संजय आनंद यांनी पुढे बोलताना, “उधमपूर जिल्ह्यातील महिला आणि वृद्धांसाठी मशरूमची लागवड हा उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. उपलब्ध संसाधनांचा उत्पादकपणे वापर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आम्ही तरुणांना पुढे येण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. मशरूम शेती ही एक फायदेशीर व्यवसाय संधी आहे.”असे म्हणत त्यांनी राज्यातील तरुणांना या शेतीसाठी प्रोत्साहित केले.
संजय आनंद यांनी, “योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाने कोणीही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. उधमपूर जिल्ह्यासाठी मशरूमची लागवड हे एक आशादायक नवीन पीक आहे. “शासन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने मशरूमची लागवड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत बनण्याची क्षमता आहे.” देशाच्या विविध भागातील शेतकरी आता नवीन प्रकारची शेती करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यांना त्यातून चांगला नफाही मिळत आहे.




