Jammu and Kashmir : काश्मीरमधील चकमकीत तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला. जुनैद अहमद बट असे त्याचे नाव आहे. तो लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचा सदस्य होता. श्रीनगरमधील जंगलात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली.
सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी मंगळवारी सकाळी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. ठार झालेला दहशतवादी जुनैद असल्याचे स्पष्ट झाले. ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांनी गांदरबलमध्ये बोगद्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या छावणीवर हल्ला केला होता.
त्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि ६ मजूर असे मिळून ७ जण मृत्युमुखी पडले होते. संबंधित भीषण हल्ल्यात जुनैद सामील होता. दरम्यान, जुनैद मारला गेला त्या जंगलाचा परिसर मोठा आहे. त्यामुळे संबंधित जंगलात त्याचे आणखी साथीदार दडल्याचा अंदाज आहे. त्यातून सुरक्षा दलांची मोहीम आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे.





