परभणी: देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे उलटली, नुकताच स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. मात्र, परभणी जिल्ह्यातील वाघाळा-फुलारवाडी या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत नेत्यांकडून फक्त आश्वासनं मिळतात, पण काम काही होत नाही. आता जिल्ह्याच्या भूमीपुत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडून नागरिकांना या रस्त्याच्या कामाची शेवटची आशा आहे. लालपरी अजूनही फुलारवाडीत पोहोचली नाही स्वातंत्र्याला 79 वर्षे झाली, तरी फुलारवाडी गावात राज्य परिवहन मंडळाची बस (लालपरी) अजूनही पोहोचलेली नाही. बाभळगाव ते फुलारवाडी रस्ता अरुंद आणि धोकादायक वळणांचा असल्याने अवजड वाहनांना प्रवेश अशक्य आहे. 1994 साली वाघाळा गावचे तत्कालीन सरपंच कै. नागोराव घुंबरे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे मातीचे काम आणि मजबुतीकरण झाले होते. पण त्यानंतर डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या नावाखाली नेत्यांनी केवळ आश्वासनं देऊन नागरिकांची फसवणूक केली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल हा रस्ता शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि आदिवासी पारधी वस्तीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो, ज्यामुळे आजारी व्यक्तींना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गरोदर महिलांची प्रसूती रस्त्यातच होण्याच्या दुर्दैवी घटनाही अनेकदा समोर आल्या. या समस्यांवर नेत्यांनी केवळ सात्वंन भेटी आणि आश्वासनं देऊन वेळ मारली आहे. पावसाळ्यात चिखलाचा त्रास, शेतकऱ्यांचे नुकसान फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्तीतील नागरिकांना बाजारहाट, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा आणि 33 केव्ही वीज उपकेंद्रासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात चिखलामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले-मुली आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवार पाणीदार असूनही, खत, औषधे आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येतात, ज्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. निधीचा अभाव, नेत्यांची टोलवाटोलवी हा रस्ता सध्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, नेते कधी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, तर कधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करतात आणि निधी मिळवतो, असे सांगून वेळ मारतात. प्रत्यक्षात निधी येतच नाही. जाणकारांच्या मते, जर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला, तर एकाच वेळी संपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत किमान 50 लाखांचा निधी दिल्यास, टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण होऊ शकते. पालकमंत्र्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या बेधडक कामगिरीमुळे नागरिकांना आशा आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण होईल. भविष्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास त्यांनी गरोदर महिला, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची या चिखलमय रस्त्यावरील कुचंबणा दूर करावी, अशी मागणी वाघाळा, फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्तीतील नागरिकांनी केली आहे. स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर फुलारवाडीकरांचे लालपरीचे स्वप्न पूर्ण होणार का, हा प्रश्न कायम आहे.