Jamkhed News : कांद्याच्या शेतात अफुची शेती; खर्डा पोलिसांनी ६ लाखांची झाडे केली जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Jamkhed News : जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे अफूच्या शेतीवर खर्डा पोलिसांनी छापा टाकला. कांद्याच्या पिकात लपवलेली २२ किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली

Jamkhed News : काही दिवसापूर्वी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे पोलीसांनी अफूच्या शेतीवर कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला प्रतिबंधित अफूची मोठी लागवड उघडकीस आली आहे.
खर्डा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ६ लाख १७ हजार रुपये किमतीची अफुची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील बांधखडक या ठिकाणी सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांनी शेत गट क्र. १९१ व १९२ मधून २२ किलो प्रतीबंधीत आसलेल्या अफूच्या झाडांची लागवड केली होती. या घटनेची माहिती खर्डा पोलिसांना मिळाली.
या संदर्भात माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेतीवर छापा टाकला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी कांद्याच्या शेतामध्ये लपवून ठेवलेली अफूची झाडे आढळून आली.
आरोपींनी गेल्या ३-४ महीन्यांपासुन या झाडांना खते आणि पाणी देऊन त्याचे संवर्धन केल्याची कबुली दिली. या छाप्यात सुमारे ६ लाख १७ हजार ७२५ रुपये किमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफुची झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलीस हवालदार संदिप धामणे यांच्या फिर्यादीवरून बांधखडक येथील सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत, संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात, विष्णु आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख, चालक शकिल बेग, संजय गुंड यांच्या पथकाने केली आहे.





