Jamkhed News : अखेर जामखेडमध्ये अतिक्रमणावर हातोडा; शहरातील वाहतूक कोंडीचा अडथळा होणार दूर
Jamkhed News : शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा ठरणार्या आणि महामार्गाच्या हद्दीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात जामखेड नगरपरिषदेने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे.

Jamkhed News : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. जामखेड-सौताडा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना गटारापासून सुमारे १० फुटांपर्यंत करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपरिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. (Jamkhed News )
मंगळवारी सकाळी १० वाजता बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. महामार्गालगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. (Jamkhed News )
या कारवाईसाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. (Jamkhed News )
शहरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण यामुळे नागरिकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईमुळे महामार्गालगतचा रस्ता मोकळा होण्यास तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Jamkhed News)
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही सुरू राहणार का आणि शहरातील इतर भागांमध्येही कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Jamkhed News)





