Jambut News : गायमुख-शिक्रापूर रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा
या रस्त्याच्या कामाला सुरुवात (Jambut News) झाली असली, तरी अत्यंत संथ गती आणि कामातील असंख्य त्रुटींमुळे काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी आणि वडनेर खुर्द या गावांतील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Jambut News : शिरूर–आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील, विशेषतः बेट भागातील गावांच्या (Jambut News) दळणवळणाला गती मिळण्यासाठी राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून ‘गायमुख -अवसरी -शिक्रापूर’ या मार्गासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून सुमारे ४१६ कोटी रुपयांचा निधी कॉंक्रिटीकरणासाठी मंजूर झाला.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात (Jambut News) झाली असली, तरी अत्यंत संथ गती आणि कामातील असंख्य त्रुटींमुळे काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी आणि वडनेर खुर्द या गावांतील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वृत्तपत्रांमधून अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित रस्ते प्रशासन व ठेकेदार यांना कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
खोदलेले पूल ठरतायत ‘मृत्यूचे सापळे’
शिरूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील काठापूर खुर्द ते टाकळी हाजी या परिसरात ठेकेदाराने अनेक पुलांचे खोदकाम करून ते अपूर्ण स्थितीत सोडले आहे. या अपूर्ण पुलांमुळे परिसरात छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने पुलांच्या बाजूला लावलेले पत्रे वादळामुळे उडून गेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी एखादा मोठा प्राणघातक अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, दुग्ध उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. आतापर्यंत या अपूर्ण पुलांवर अनेक विद्यार्थी व नागरिक अपघातात जखमी झाले आहेत.
अधिकारी अन् ठेकेदार ‘संपर्काबाहेर’
झोपेचे सोंग घेतलेल्या रस्ते प्रशासन आणि ठेकेदाराला या गंभीर परिस्थितीची (Jambut News) कोणतीही पर्वा उरलेली नाही. या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, ठेकेदार किंवा कामाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत. “येथे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनाच पूर्णपणे जबाबदार धरले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बंपलवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
मंत्र्यांकडे तक्रार अन् रस्ता रोकोचा इशारा
अनेकदा वृत्त प्रसिद्ध होऊनही ढिम्म राहिलेल्या या यंत्रणेविरोधात आता सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पुढील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली जाणार आहे. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि निष्काळजी ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकावे, अशी मागणी या तक्रारीत केली जाणार आहे.
“रस्त्याच्या कामामुळे होत असलेल्या अपघातांचे अधिकारी व ठेकेदाराला गांभीर्य नसेल, तर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली जाईल. तसेच, पुढील ८ ते १० दिवसांत योग्य उपाययोजना न झाल्यास रस्ते प्रशासन व अधिकाऱ्यांविरोधात पंचतळे (ता. शिरूर) येथील मुख्य चौकात ‘बेल्हे-जेजुरी’ राज्यमार्ग अडवून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
शंकर पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते






