Jalna Election Result: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी जालन्यातून विजयी

Jalna Election Result : राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान जालन्यातील एका निकालामुळे तीव्र चर्चा सुरू झाली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी असलेले श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर साजऱ्या करण्यात आलेल्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विजयानंतर श्रीकांत पांगारकर यांनी कार्यकर्त्यांसह ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नाचत-गात साजरा करण्यात आलेल्या या विजयाचे दृश्य सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर विजय
पत्रकार गौरी लंकेश यांच्या ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. या हत्या प्रकरणात श्रीकांत पांगारकर यांच्यावर आरोपी म्हणून आरोप ठेवण्यात आले आहेत. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना या प्रकरणात अटक केली होती.
VIDEO | Jalna, Maharashtra: Journalist Gauri Lankesh murder accused Shrikant Pangarkar celebrates his victory with supporters after winning the Jalna Municipal Corporation elections as an independent candidate.
#Jalna #MaharashtraCivicPolls2026
(Full video available on PTI… pic.twitter.com/slFETxVN1w
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2026
याशिवाय, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नालासोपारा शस्त्रास्त्र जप्ती प्रकरणातही पांगारकर यांना अटक केली होती. त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही काळ ते आर्थर रोड तुरुंगात होते. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने गौरी लंकेश हत्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
राजकीय पार्श्वभूमी
श्रीकांत पांगारकर हे २००१ ते २००६ या काळात शिवसेनेचे सदस्य म्हणून जालना नगर परिषदेवर नगरसेवक होते. २०११ मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी उजव्या विचारसरणीच्या हिंदू जनजागृती समितीत सहभाग घेतल्याचे समोर आले होते.
समाजात तीव्र प्रतिक्रिया
गंभीर स्वरूपाच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना निवडणुकीतील हा विजय आणि त्यानंतर साजरा करण्यात आलेला जल्लोष यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले असून, न्यायप्रक्रिया सुरू असलेल्या प्रकरणांतील आरोपींच्या राजकीय सहभागावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, कायद्याच्या दृष्टीने पांगारकर हे जामिनावर मुक्त असून दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना आरोपीच मानले जाईल, अशी भूमिका कायदेतज्ज्ञांकडून मांडली जात आहे. जालना महापालिकेतील या निकालामुळे राज्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक चर्चेत नवे वादळ निर्माण झाले आहे.


