Jalgaon Bank Robbery : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला दरोड्याचा कट! २७ किलो सोने अन् साडेबारा लाखांची रोकड लंपास; चौघे जेरबंद
Jalgaon Bank Robbery : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेवर पडलेल्या धाडसी सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.

Jalgaon Bank Robbery : जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात स्टेट बँकेच्या शाखेवर झालेल्या सशस्त्र दरोड्याने मोठी खळबळ उडाली आहे. बंदुकीचा धाक दाखवत आणि गोळीबार करत दरोडेखोरांनी तब्बल २७ किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. (Jalgaon Bank Robbery)
मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता, ग्रामस्थांचे धाडस आणि पोलिसांची तत्परता यामुळे चारही आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार चक्क बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याने तुरुंगात असतानाच या दरोड्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. (Jalgaon Bank Robbery)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर जसक नावाचा पोलीस उपनिरीक्षक २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बँक दरोड्याच्या प्रकरणात दोषी आढळला होता. त्यानंतर पोलीस विभागाने त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता. याच काळात त्याची खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गजानन पवार याच्याशी ओळख झाली. पुढे या दोघांनी मिळून बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon Bank Robbery)
या कटात अंकुश चव्हाण आणि श्रवण चव्हाण या आणखी दोघांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांनी मिळून भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेला लक्ष्य केले. दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यानंतर गोळीबार करत सोने आणि रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. (Jalgaon Bank Robbery)
ग्रामस्थांचा सिनेस्टाईल पाठलाग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोड्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनीही तातडीने नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला. या दरम्यान एक आरोपी विदगावजवळ आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित आरोपींचाही पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. (Jalgaon Bank Robbery)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, तुरुंगातून दरोड्याचा कट कसा आखण्यात आला आणि त्यासाठी कोणत्या प्रकारे नियोजन करण्यात आले, याचा तपास सुरू आहे. अल्पावधीत आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात यश आल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Jalgaon Bank Robbery)





