Indian seafarers : समुद्रात भारतीय नाविकांचा जीव धोक्यात; जयशंकरांचा मोठा इशारा, म्हणाले- ‘निरपराधांचा जीव घेणे अजिबात योग्य नाही’
Indian seafarers : समुद्रातील व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. एस. जयशंकर यांनी भारतीय नाविकांच्या सुरक्षेसाठी जागतिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडला.

Indian seafarers : विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी समुद्रातील व्यापारी जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लाल समुद्र, काळा समुद्र आणि होर्मुझच्या परिसरात व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली आहे.
लाइबेरियासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी नाविकांच्या सुरक्षेसाठी ‘ग्रुप ऑफ फ्रेंड्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. भारत हा जगातील मोठ्या नाविक पुरवठादार देशांपैकी एक आहे, तर लाइबेरिया हे मोठे जहाज नोंदणी केंद्र आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी समुद्री वाहतूक आणि नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आणला आहे.
‘या आता एक-दोन घटना राहिलेल्या नाहीत’
ओमानच्या किनाऱ्याजवळ २३ सप्टेंबर रोजी MV Cape Dao या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर भारतीयांसह २८ जणांचा कर्मचारी वर्ग होता. हल्ल्यात भारतीय नाविक सूरज यादव यांचा मृत्यू झाला. भारतीय दूतावासाने १९ भारतीय नागरिक जहाजावर असल्याचे सांगितले असून बचावलेल्या कर्मचाऱ्यांना ओमानच्या नौदलाने सुरक्षित बाहेर काढले.
या घटनेनंतर भारताने व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने अशा हल्ल्यांना आळा घालण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुरू राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
जयशंकर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आखात, लाल समुद्र आणि आसपासच्या भागात व्यापारी जहाजे आणि नाविकांवर वारंवार हल्ले झाले आहेत. काळ्या समुद्रातही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एखाद्या देशाच्या नाविकांच्या सुरक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही.
‘समुद्री व्यापाराला लक्ष्य करणे योग्य नाही’
जयशंकर यांनी समुद्री व्यापाराला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला. त्यांच्या मते, निरपराध नाविकांचा जीव धोक्यात घालणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाहतुकीत अडथळे निर्माण करणे योग्य नाही.
भारताने यापूर्वीही संघर्षग्रस्त समुद्री मार्गांमध्ये नाविकांची सुरक्षा आणि जहाजांची मुक्त वाहतूक सुनिश्चित करण्याची भूमिका मांडली आहे. भारतीय नौवहन महासंचालनालयानेही आखात, होर्मुझ आणि ओमानच्या आखातातील भारतीय नाविकांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.





