Jairam Ramesh : वेस्ट बँक भागात इस्रायलकडून सुरू असलेल्या एकतर्फी कारवायांचा निषेध करणाऱ्या देशांच्या यादीत भारत उशिरा सामील झाल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी इस्रायल दौरा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने घेतलेली भूमिका यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सरकारवर दांभिकपणाचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये १७ फेब्रुवारी रोजी जगातील ८५ देशांनी एकत्रितपणे इस्रायलच्या वेस्ट बँकमधील धोरणांवर टीका करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात हजारो पॅलेस्टिनींचे विस्थापन आणि त्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे, १८ नोव्हेंबर १९८८ रोजी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक असूनही, सुरुवातीच्या ८५ देशांच्या यादीत भारताचे नाव नव्हते. भारताने तब्बल २४ तासांनंतर या निषेध प्रस्तावात आपले नाव जोडले आहे. या विलंबावर भाष्य करताना जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, भारताचा हा निर्णय म्हणजे निव्वळ दांभिकपणा आणि स्वार्थ आहे. पंतप्रधान मोदी पुढच्या आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. जर पंतप्रधानांना खरोखरच या विषयाचे गांभीर्य असेल, तर त्यांनी त्यांचे मित्र बेंजामिन नेतन्याहू यांना जाहीरपणे टोकले पाहिजे आणि वेस्ट बँकमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल भारताची तीव्र नाराजी व्यक्त करायला हवी, असे आव्हानही त्यांनी दिले. .. हे परराष्ट्र धोरणाचे दुर्दैव पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळण्यापूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी ती जाहीर केली होती. १५ फेब्रुवारी रोजी एका अमेरिकन ज्यू संघटनेच्या परिषदेत बोलताना नेतन्याहू यांनी मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख केला होता. यावरूनही काँग्रेसने सरकारला घेरले असून, भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या देशाऐवजी परदेशी नेत्यांकडून ऐकायला मिळणे हे दुर्दैवी असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.