पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण: “230 कोटी रुपये गोठवा…”; रवींद्र धंगेकर यांचे नवे ट्वीट चर्चेत, केली ‘ही’ मोठी मागणी

Ravindra Dhangekar post : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसचे जमीन विक्री प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. अशातच या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. पण त्यांनी केलेल्या मागणीवरून रवींद्र धंगकेर यांनी एक्सवरून एक ट्वीट करत मोठी मागणी केली आहे. यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्वीस्ट आला आहे. विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला ई-मेल पाठवला होता.
या ईमेलमधून त्यांनी जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करत असल्याचे म्हटले होते. पण त्यांनी आपले २३० कोटी रक्कम परत मिळावी, असे या ईमेलमध्ये त्यांनी म्हटले होते. यावर रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट करत 230 कोटी रुपये गोठवण्यात यावे, अशी मोठी मागणी केली आहे.
हेही वाचा : बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरात भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’
रवींद्र धंगेकर यांचे ट्वीट
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही, असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे गैर व्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नियुक्त करावा, अशी मोठी मागणी त्यांनी ट्वीटमध्ये केली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 28, 2025
या पुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. यात काही न्यायमूर्ती तसेच आय.ए.एस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी. यात अजून एक पळवाट अशी आहे की, चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे, यावेळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं राजकीय दबावात काम करत वेगळा निकाल दिला तर ही 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल, असा माझा अंदाज आह, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
हे 230 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी दहा हजार मुला मुलींची रहिवासी क्षमता असलेले असलेले चांगले वस्तीगृह होऊ शकते, असे रवींद्र धंगेकरांनी आपले मत मांडले आहे. यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अनेक मोठे दावे केलेले आहेत.
हेही वाचा : नाट्य विश्वावर शोककळा! ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास





