नाट्य विश्वावर शोककळा! ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gangaram Gavankar passes away : मराठी नाट्य सृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव मालवणी नाटकांचा पाया रचणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दहिसर पूर्व येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाश्वात तीन मुलगे, सुना आणि नातवांडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नाट्य सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती नाजूक होती. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन, तिला मुख्य प्रवाहात आणणारे गवाणकर यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांनी मालवणी नाटकांची स्वतंत्र लाट निर्माण करण्याचे काम केले. वेडी माणसे हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक नाटके लिहिली. या सर्वच नाटकांवर रसिकांनी खूप प्रेम केले.
त्यांच्या लेखनाचे वैशिष्ये म्हणजे विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. ‘वन रूम किचन’ या नाटकाने देखील प्रेक्षकांना भुरळ पाडली. याही नाटकाचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. त्यांचे वस्त्रहरण हे नाटक खूप गाजले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली. या नाटकाचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले.
१९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात ‘बॅकस्टेज’वरून केली. त्याच काळात ‘एमटीएनएल’मध्ये ते नोकरी करीत होते, पण नाट्यकलेवरील त्यांच्या अतुट प्रेमामुळे त्यांनी नोकरीसह रंगभूमीशी आपले नाते घट्ट केले. अशा या थोर कलाकाराच्या निधनाने नाट्यसृष्टीतील मोठा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.





