Delhi Liquor Scam: तुरूंगात असलेले आप नेते संजय सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ

नवी दिल्ली – दिल्ली मद्य घोटाळ्यात सध्या तुरूंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीच्या तुरूंगात असलेल्या संजय सिंह यांना उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील न्यायालयाने आता झटका दिला आहे.
माजी जलसंपदा मंत्री महेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या एका मानहानी प्रकरणात लखनौ न्यायालयाने संजय सिंह यांना एक लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच सिंह यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते महेंद्र सिंह यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट केल्या आहेत त्या तात्काळ हटवल्या जाव्यात असे आदेशही न्यायालयाने दिले.
दोन वर्षांपूवी महेंद्र सिंह उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री होते. त्यावेळी संजय सिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, आता न्यायालयाच्या निर्णयानंतर महेंद्र सिंह म्हणाले की निराधार आरोप करण्याची संजय सिंह यांना सवयच जडली आहे.
त्यांनी जे आरोप केले आहेत त्याच्या पुष्टीसाठी अथवा समर्थनार्थ कोणताही पुरावा ते सादर करू शकले नाहीत. जर संजय सिंह यांनी दोन महिन्यांच्या आत दंडाची एक लाख रूपये रक्कम भरली नाही तर त्यांना न्यायालयाने निकाल दिल्याच्या तारखेपासून ६ टक्के व्याजासह दंड भरावा लागणार आहे.





