Delhi Assembly Elections: ‘आप’च्या 7 आमदारांना ‘भाजप’ नेत्यांचा फोन; प्रत्येकी 15 कोटींची ऑफर – संजय सिंह

Delhi Assembly Elections: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी सर्व 70 जागांसाठी मतदान झाले. 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. निकालापूर्वीच आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. ‘आप’च्या 7 आमदारांना भाजपच्या लोकांचे फोन आल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. या आमदारांना आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये येण्यासाठी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.
संजय सिंह म्हणाले की, आम्ही आमदारांना असे कॉल रेकॉर्ड करून तक्रार करण्यास सांगितले आहे. जर कोणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गुपचूप व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आले आहे. मतमोजणीपूर्वीच भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणे दिल्लीतही भाजपने पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्याचवेळी, आप नेते सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी सांगितले की, आलेले एक्झिट पोल केवळ एक दिवसाचे आहेत. खरे निकाल जाहीर झाल्यावर दिल्लीत पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होईल.
#WATCH | Delhi: AAP MP Sanjay Singh says, “Seven MLAs (of AAP) have received phone calls from some BJP elements, who have offered to give them Rs 15 crore to leave the Aam Aadmi Party and join the BJP… We have told the MLAs to record such audio calls and complain about it. If… pic.twitter.com/YbYhfu7rEC
— ANI (@ANI) February 6, 2025
एक्झिट पोल फक्त एका दिवसासाठी –
भारद्वाज म्हणाले की, जर भाजप एक्झिट पोलच्या निकालांवर खूश असेल तर त्यांनी एक्झिट पोलच्या आधारे आपले सरकार बनवावे. तुम्ही मुख्यमंत्री आणि मंत्री बनवा. प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर ‘आप’चे सरकार स्थापन होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. हे एक्झिट पोल फक्त एका दिवसासाठी आहेत. देशात पूर्वी निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्था होत्या, आता त्यांच्यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे.
आता या संस्था सरकारऐवजी भाजपच्या विभागाप्रमाणे काम करत आहेत. देशात लोकशाहीची मुळे सातत्याने कमजोर होत आहेत. आपचे खासदार मलविंदर सिंग कांग म्हणाले की, दिल्लीतील जनता आम आदमी पार्टीच्या सरकारलाच निवडून देईल. केजरीवाल सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरी लक्षात घेऊन जनतेने मतदान केले आहे. निकाल आपच्या बाजूने लागतील.





