जय महाकाल ! विराट-अनुष्कानंतर उमेश यादवने देखील घेतले बाबांचे दर्शन.. भस्म आरतीलाही लावली हजेरी

मुंबई – आयपीएलच्या 16व्या हंगामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगच्या तयारीत 10 संघ व्यस्त आहेत. दरम्यान, आयपीएलपूर्वी भारतीय संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज उमेश यादवने बाबा महाकालचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये उमेश केकेआर संघाकडून खेळताना दिसणार आहे,
काही काळापूर्वी उमेशवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. 23 फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या वडिलांना गमावले. त्यावेळी तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत होता. उमेशने २० मार्चला महाकाल भस्म आरतीला हजेरी लावली. भस्म आरतीनंतर तो गाभाऱ्यात पोहोचला आणि जलाभिषेक करून त्याने बाबा महाकाल यांचे आशीर्वाद घेतले. आयपीएल पूर्वी पूजा करतानाचे उमेशचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बाबा महाकालचे दर्शन घेतल्यानंतर उमेशने पत्रकारांशी संवाद साधला. देशात आणि जगात शांती आणि आनंद नांदावा यासाठी बाबांकडे प्रार्थना केल्याचे त्याने यावेळी सांगितले. महाकाल दर्शनाचे उमेश यादवाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
या खेळाडूंनी देखील घेतले महाकालचे दर्शन
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव जानेवारी 2023 मध्ये महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला होता. यानंतर सूर्याने न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळली. यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी चार मार्च रोजी मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. यापूर्वी अक्षर पटेल आणि त्यांच्या पत्नीने गेल्या महिन्यात मंदिरात जाऊन बाबा महाकालची पूजा केली होती. तसेच केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनेही मंदिरात जाऊन बाबा महाकालचे दर्शन घेतले. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुलने 75 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.





