‘Jai Bheem’ Coaching Scheme । दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आप सरकारच्या कार्यकाळात मोफत कोचिंग योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश एसीबीला दिले आहेत. शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी ही माहिती दिली आहे. ‘जय भीम प्रतिभा विकास योजने’अंतर्गत, एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी खाजगी संस्थांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात आले. माध्यमांशी बोलताना मंत्री सूद यांनी,”२०२१-२२ मध्ये कोविड-१९ साथीच्या काळात खाजगी संस्थांना पैसे देण्यासाठी १४५ कोटी रुपयांचे बिल तयार करण्यात आले होते” असा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, “मागील आप सरकारने कोचिंग संस्थांकडून विद्यार्थ्यांची यादी मागितली नाही किंवा त्यांना कोचिंग दिले जात आहे की नाही याची पडताळणी केली नाही”. तसेच ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस केली होती.’ कल्याणकारी योजना भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला बनल्या ‘Jai Bheem’ Coaching Scheme । आशिष सूद म्हणाले, ‘२०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेचा उद्देश सरकारी पैसे थेट कोचिंग संस्थांना हस्तांतरित करून मोफत कोचिंग प्रदान करणे हा होता. ‘आप’ नेत्यांनी आंबेडकरांच्या वारशाचा अपमान केला आहे आणि एका कल्याणकारी योजनेला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले आहे. २०१८ मध्ये ४,९०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार होते आणि २०१९ मध्ये ही संख्या २,०७१ होती. तथापि, महामारीच्या काळात, आप नेत्यांनी कोचिंग माफियांशी संगनमत केले. प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागेल दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना, ‘आप सरकार चालवत असलेल्या जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेत २०२१-२२ या वर्षात गंभीर आर्थिक अनियमितता समोर आल्या आहेत. या योजनेचे बजेट फक्त १५ कोटी रुपये होते, परंतु ‘आप’ सरकारने सुमारे १४५ कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या फायली पुढे पाठवल्या. दलितांच्या नावाखाली सत्ता हस्तगत करून आम आदमी पक्षाने दलित मुलांचे भविष्य लुटले आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या आदर्शांचा अपमान केला आहे आणि त्यांच्या भ्रष्ट धोरणांनी शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रालाही कलंकित केले आहे. गुप्ता पुढे म्हणाल्या, ‘दलित मुलांना प्रशिक्षण मिळावे म्हणून कागदपत्रांशिवाय दावे, स्वाक्षरीशिवाय अर्ज आणि अनेक संस्थांचे १००% दावे बनावट असल्याचे आढळून आले. लाचलुचपत प्रतिबंधक शाखा (एसीबी) आता या आर्थिक अनियमिततांची चौकशी करेल. लवकरच सर्व काही स्पष्ट होईल. आम आदमी पक्षाने काय म्हटले? ‘Jai Bheem’ Coaching Scheme । आम आदमी पक्षावर ही योजना बंद केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, ‘भाजपा या योजना बंद करण्याचे समर्थन करण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, तर आजपर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मोहल्ला क्लिनिक बंद करण्यापासून ते महिलांसाठी मोफत बस प्रवास बंद करण्यापर्यंत आणि सरकारी रुग्णालयांमधून मोफत औषधे काढून घेण्यापर्यंत, प्रत्येक पाऊल जाणूनबुजून आपच्या प्रशासनाच्या मॉडेलला नष्ट करण्यासाठी उचलले जात आहे.”