जामखेडमध्ये बाबासाहेबांची १३४ वी जयंती जल्लोषात; “जय भीम”च्या घोषणांनी शहर दणाणले

जामखेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. समता ग्रुप आणि सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य मिरवणुकीत डीजे, लेझीम पथक आणि महिलांची उपस्थिती आकर्षण ठरली. “एकच साहेब… बाबासाहेब” आणि “जय भीम”च्या घोषणांनी शहर दणाणले. समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे यांच्या नियोजनाखाली आरोळे वस्तीतील मिरवणूक, तर सदाफुले वस्तीतील सिद्धार्थ मित्र मंडळाच्या डीजेने परिसर भारावून टाकला.
शहरात विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निळे ध्वज फडकवत भीमसैनिकांनी आंबेडकरी चळवळीचा जागर केला. दलित संघटनांनी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवले, तर सकाळपासून भीमभक्त अभिवादनासाठी उसळले. विविध मंडळांनी पाणीवाटप आणि अल्पोपहाराचे आयोजन केले. या उत्सवाने बाबासाहेबांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे विचार पुन्हा एकदा अधोरेखित झाले.





