Pimpri : औद्योगिक क्षेत्र भयमुक्त ठेवण्यासाठी कटीबद्ध : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

वडगाव मावळ : औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून कंपन्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेऊन संबंधितांवर कारवाई केली जाते. त्यामुळे कंपन्यांना कोणीही त्रास देत असेल तर कंपन्यांनी पुढे येऊन पोलिसांची मदत घ्यावी. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करतील, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.
तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील सर्व औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी व पोलीस विभाग यांची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीत (दि. २६) आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, महावितरण तळेगाव दाभाडेचे उपअभियंता जयप्रकाश सगरे, जेसीबी इंडियाचे प्रकल्प प्रमुख संकेत विरकर, महावितरण सहाय्यक अभियंता इंदोरी विभागचे प्रशांत पवार, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता किरण कंक, राजेश धोत्रे, तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, सामाजिक सुरक्षा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त चौबे यांनी तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तळेगाव एमआयडीसी मधील कंपन्यांना प्रामुख्याने नवलाख उंबरे, जाधववाडी रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी, नवीन रस्त्याच्या बाबतीत जमीन अधीग्रहण, रस्त्याची दुरवस्था, होणारे अपघात या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील औद्योगिक तक्रारींचे निवारण करण्याकरीता आयुक्तालयात इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेलची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत औद्योगिक विभागाच्या अडचणी सोडविण्यात येतात.
सर्व तक्रारींवर तत्काळ कारवाई होणार
तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या यांनी चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही बसविण्यात यावे. कंपनीने कामगारांचे होणारे अपघात टाळण्यासाठी कामगारांना हेल्मेट वापरण्याबाबत पुढाकार घ्यावा. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कंपन्यांनी कामाच्या वेळेचे नियोजन करावे. कामगारांच्या सुरक्षेबाबत त्यांना लवकारात लवकर मदत मिळावी, याकरिता त्यांनी ११२ या क्रमांकावर कॉल करावा. कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्याकडे येणारे ट्रक, ट्रेलर हे रोडवर लागणार नाहीत, तसेच त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही, याची दक्षता घेऊन जड वाहनांना कंपनीच्या जागेत पार्किंग उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, विशेषतः महिलांविषयी काही समस्या उद्भवल्यास, कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. अशा सर्व तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि न्याय दिला जाईल. औद्योगिक क्षेत्रातील वातावरण हे भयमुक्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.





