Jagdeep Dhankhar : शेतकरीपुत्र असणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. ती बाब मोदी सरकारला रूचली नाही. त्यामुळे धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले, असा आरोपवजा दावा कॉंग्रेसने शनिवारी केला. भारत-अमेरिका व्यापार करारावरून सध्या मोठे राजकीय वादळ घोंघावत आहे. त्या करारातून शेतकऱ्यांच्या हितांशी तडजोड करण्यात आली, अशी टीका विरोधक करत आहेत. तो धागा पकडून आणि धनखड यांचा संदर्भ देऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून सरकारला लक्ष्य केले. राजीनामा देणाऱ्या धनखड यांच्यासाठी आजपर्यंत कुठलाही निरोप समारंभ आयोजित करण्यात आला नाही. Vice Presidential Election । त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरे स्वरूप समोर येते. मोदींनी अमेरिकेशी व्यापार करार करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अशी टिप्पणी त्यांनी केली. धनखड यांनी २१ जुलै २०२५ यादिवशी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्या तडकाफडकी कृतीसाठी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले. मात्र, विरोधकांनी त्या कारणाविषयी नेहमीच साशंकता व्यक्त केली.