Jaaved Jaaferi birthday: बॉलिवूडमधील बहुगुणी कलाकार म्हणून ओळखले जाणारे जावेद जाफरी आज 63 वर्षांचे झाले. दिग्गज विनोदी कलाकार जगदीप यांचे ते पुत्र. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी होते. वडिलांइतके मोठे नाव त्यांनी कमावले नसले तरी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात आणि आपल्या वेगळ्या शैलीने मन जिंकण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. ते अभिनेता, कॉमेडियन आणि उत्कृष्ट नर्तक अशा तिन्ही भूमिकांत लोकप्रिय आहेत. करिअरची सुरुवात जावेद जाफरी यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी, 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरी जंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. लक्षवेधी बाब म्हणजे पहिल्याच चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती त्यांच्या कॉमेडी भूमिकांमुळे. ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘धमाल’, ‘फायर’, ‘अर्थ’, ‘3 इडियट्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले. अलीकडेच ते ‘दे दे प्यार दे 2’ मध्ये दिसले. जावेद यांच्या काही खास गोष्टी जावेद जाफरी यांनी दोनदा विवाह केला आहे. त्यांचा पहिला विवाह 1989 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार यांच्याशी झाला होता. मात्र ही साथ फक्त एका वर्षाची ठरली. नंतर त्यांनी हबीबा जाफरी यांच्याशी विवाह केला. जावेद जाफरी यांचे डान्स मूव्हज नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आज 63 वर्षांच्या वयातही ते तितकेच फिट आहेत आणि त्यांच्या नृत्यावर तरुण चाहते आजही फिदा होतात. त्यांच्या वडिलांनी विनोदाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले. त्यांचे भाऊ नावेद जाफरी हे टीव्ही दिग्दर्शक राहिले आहेत. डबिंगचे बादशाह: जावेद जाफरी यांना टॅलेंटची खाण मानले जाते. त्यांनी डबिंगच्या क्षेत्रातही मोठे काम केले असून ‘गूफी’, ‘मिक्की माउस’ यांसारख्या अनेक लोकप्रिय कार्टून पात्रांना त्यांनी हिंदी आवाज दिला आहे. आजही त्यांच्या डबिंगचे छोटे व्हिडिओ आणि रील्स प्रचंड व्हायरल होतात. जावेद जाफरी यांची कॉमेडी, डान्स, अभिनय आणि आवाज या सगळ्यांच्या मिश्रणातून त्यांनी एक खास ओळख तयार केली आहे. 63 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.