Chhagan Bhujbal : चर्चा खरी ठरली…! छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; राजकीय कारकीर्द काय? जाणून घ्या सविस्तर…

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज (दि. २०) राजभवनात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्यासह पन्नास मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे आता छगन भुजबळ यांना कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यापूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या रिक्तपदी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय कारकीर्द काय?
छगन भुजबळ यांनी १९६० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे.
त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.१९७३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. १९७३ ते १९८४ या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर १९८५ मध्ये महापौर झाले.
विधानसभेवर भुजबळ १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री तसेच एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अशी त्यांची तेव्हा कारकीर्द होती. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली.
एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन मंत्रालयांचा कारभार त्यांनी बघितला. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री, तर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.
२००९ मध्ये दुसऱ्यांदा, तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
दरम्यान भुजबळ यांनी राजकीय कारकीर्दीत आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेत देखील ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत.





