पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यापुढे निवडणुक लढविण्यास अपात्र; निवडणुक आयोगाचा निर्णय

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी हा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मालमत्ता लपवल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात हा बडगा उचलण्यात आला आहे.
त्यामुळे इम्रान खान यांचे राजकीय भवितव्यच धोक्यात आले आहे. तथापि निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा मार्ग इम्रान खान यांना उपलब्ध आहे.
इम्रान खान यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी आपल्याकडील मोठी संपत्ती लपवली असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी राज्याच्या भांडारातून अनेक वस्तु सवलतींच्या दरात खरेदी केल्या आणि त्या मोठ्या किंमतींना विकल्या त्यातून मिळालेले उत्पन्न त्यांनी दडवून ठेवले आहे. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने रितसर चौकशी करून हा निर्णय दिला आहे.





